Twitter Facebook Delicious Digg Stumbleupon Favorites More

Thursday, 30 May 2013

पुस्तकांसाठी घर बांधणारे - पुस्तकप्रेमी बाबासाहेब....!!!



बाबासाहेब म्हणत, "अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात, तर त्याचा दुराभिमान बाळगू नका, आपल्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा....!!! बाबासाहेबंशिवाय शिक्षणाचे महत्व जाणणारा या भूमीवर जन्माला न्हवता आणि कदाचित जन्मणार देखील नाही.

इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी पाहतो, जॉर्ज पंपन च्या स्वागतासाठी कोणी मुंबईत "गेट-वे ऑफ इंडिया" बांधले शहजाहने आपल्या प्रिय पत्नी मुमताज हिच्या साठी "ताजमहाल" बांधले, राजे महाराजे यांनी विस्तीर्ण वैशिष्ठपूर्ण राजवाडे, शिश महाल, राजमहाल, सोनेरी महाल, तर कुणी मंदिरे मस्जीदी बांधल्या, कोणी सोन्याच्या विटांनी तर कोणी हिरे मानिकांनी मढवलेले सुवर्ण मंदिर अशी कित्येक सुंदर कालाकृत्या बांधल्या, परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न, पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वत:ला राहण्यासाठी घर बांधतो, मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वत:चे राजगृह बांधले, पुस्तकांसाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न न्हवते तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता. 

बालपणापासून अस्पृश्य समाजातील इतर आपल्या समाज बांधवांसह जो अन्याय अत्याचार प्रचंड मानहानी त्यांनी सोसली, त्यामुळे व्यथित झालेल्या बाबासाहेबांनी विचार केला कि, "हे माझ्यावर अत्याचार केवळ माझ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर ते सर्वच बांधवांवर होत आहेत. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपण स्वत मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या पूर्ण समर्थ असणे अत्यंत आवश्यक आहे." यासाठी ज्ञानप्राप्ती करून घेणे गरजेचे आहे, या विचारातून त्यांच्या मनात जिद्द निर्माण झाली आणि ज्ञानप्राप्ती साठी "पुस्तकभांडार" असणे त्यांना आवश्यक  वाटत होते,    

बाबासाहेबांची सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थित गेले, समाजाच्या हितासाठी त्यांनी वकिली सुरु केली, एक हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती चोहीकडे पसरली होती, 

एक प्रसंग सांगावासा वाटतो... एकदा गेमे वाडीच्या महाराची जमीन ऐंशी वर्षे दुसऱ्याच्या ताब्यात होती. ती बाबासाहेबांनी सोडवून दिली, त्यांनी साहेबाना फी दिली. बाबासाहेबांनी घरी येवून धोतराच्या सोग्यातील सारे रुपये रमाई च्या पुढे ओतले, आणि म्हणाले, 
"हे घे पैसे, मी संसारात लक्ष घालत नाही,बायको मुलांकडे लक्ष देत नाही, असा सारखी माझ्यावर ओरडत असतेस, हे पैसे मोजून किती ते  सांग...! 
रमाई ने पैसे गोळा केले आणि वीस वीसच्या चवडी आणि दोन दहाच्या अन एक एकची वड आहे असे सांगितले...बाबासाहेब म्हणाले... "आग पण ते किती ?, 
रमाई म्हणाल्या...."मी अडाणी हाय.....या सगळ्या रुपयाला किती म्हणतात ते तुमालाच ठावूक..!"       
तेव्हा बाबासाहेब म्हणाले..."तू अडाणी आहेस ते बरे झाले नाहीतर बॅरिस्टर होऊन मला चांगल हैराण केलं असतंस..!"
त्यावर रमाई म्हणाल्या, " मी  ब्यारीस्टरच हाय....., "तुम्हाला एवढ बी काळात नाही.....बॅरिस्टर ची बायको   बॅरिस्टरच कि" त्यावर दोघेही खो खो हसले...     

बाबासाहेबांची आर्थिक स्थिती सुधारली ती १९३० सालानंतर, त्यांनी मुंबईत दोन इमारत बांधायचे ठरविले, एक राहण्यासाठी आणि दुसरी पुस्तकांसाठी..त्यांच्या ग्रंथ संपादांसाठी म्हणून त्यांनी दादर हिंदू कॉलनी येथे ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. दोन्ही प्लॉट चे भूमिपूजन १९३० सप्टेंबर महिन्यात झाले. ९९ क्रमांकाचे प्लॉटवरील इमारतीस "चारमिनार" तर १२९ क्रमांकाच्या प्लॉट वरील इमारतीस सिद्धार्थ गौतमाच्या राजमहालाचे नाव "राजगृह" असे नाव दिले. 

इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. बाबासाहेब हे स्वत ज्ञानपिपासू असल्यामुळे त्यांची ज्ञान ची भूक मोठी होती, त्यांची विद्यासंपन्न करण्याची अभिलाषा महान होती, त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये कुतूहल होते, आजही आहे.  इंग्लिश लेखक थॉम्पसन म्हणतो की,"डॉ. आंबेडकरांचे जे जे साहित्य दृष्टीस पडेल ते ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉ. आंबेडकरांमुळे सनातनी प्रवृत्तींना वेडाचे झटके येतात."      

Rajgruh mumbai
डॉ.  बाबासाहेबांनी  परदेशी आपला विद्याभ्यास मोठ्या जिद्दीने पूर्ण केला. बाबासाहेब भारतात परत येताना त्यांनी काही ग्रंथ भारतात पाठविण्यासाठी एका जहाज कंपनीला दिले होते. ते जहाज भारतात येताना काही प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने जहाजातील काही ग्रंथ समुद्रात पडले, हे जेव्हा बाबासाहेबांना कळले तेव्हा ते फार दुखी झाले होते.  मायदेशी परतल्यावर बाबासाहेब अभ्यासात गुंतून जात, एकदा वाचायला लागले कि पुस्तकामध्ये अगदी गढून जात, अन्न पाणी सर्व काही विसरून जात, त्यांच्या अभ्यासाच्या मध्ये कोणी आलले त्यांना खपत नसे ते लगेच रागवत, परदेशातून आल्यावर परदेशातील वाचनालायासारखे आपले स्वताचे एक भव्य दिव्य वाचनालय असावे असे त्यांना नेहमी वाटे त्यामुळे त्या दृष्टीने ते प्रयत्नशील होते, स्वताच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एक सुवर्ण संधी समजून ती सत्कारणी लागावी म्हणून बाबासाहेब नेहमी झटत.   
  
बाबासाहेबांसारखा ज्ञान साधनेसाठी धडपडणारा हा ज्ञानमहर्षी स्वतचे ग्रंथालय कश्या प्रकारे ठेवीत असेल याची कल्पना करावी. ग्रंथांसाठी घर बांधताना त्यांनी त्या संम्बंधी  पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंध क्षणार्धात मिळाले पाहिजेत, अश्या पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली.    
ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयार्क मधील ग्रंथालायासारखीच केली तर मोठमोठ्या इमारती सारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, भरपूर प्रकाश येईल अश्या विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतींमध्ये बांधलेला सज्जाचा माळा, हि पुत्कांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्टे पाहताना रोम,नुयार्क, इंग्लंड,अमेरिका, या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथांचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते.

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजगृह दादर येथी हिंदू  कॉलनीत दिमाखाने उभे होते. त्या कॉलनीत साहित्यिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकारणी, मोठ मोठे व्यापारी देखील राहत होते, परंतु रत्नजडीत  हिऱ्याच्या कोंदणात "कोहिनूर" जसा चकचकवा तसे बाबासाहेबांचे "राजगृह" चमकत होते.  

बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम जगविख्यात आहे, देश विदेशातील नानाविविध ग्रंथालयांना भेटी देवून, नाव नवीन ग्रंथ मागवून त्यांनी आपल्या संग्रही ठेवले. बाबासाहेब जेवढे प्रेम इंग्रजी पुस्तकांवर करत तेवढेच ते मराठी पुस्तकांवर देखील करत. परदेशात असताना ते आवडीने मराठी ग्रंथ मागवून त्याचे वाचन करीत व त्यावर टिप्पणी हि करत, बाबासाहेबांच्या या ग्रंथ प्रेमामुळे बाबासाहेबांचे विचारांचे सामर्थ अत्यंत बळकट असे झाले होते. मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३०००, इतिहासावर २६००, कायद्यावर आधारित ५०००, धर्मशास्त्रावर २०००, चरित्रे १२००, इतर साहित्य ३०००, अर्थशास्त्र १०००, तत्व ज्ञान ६०००, युद्धशास्त्र ३००० व इतर ७९०० असा आकडा होतो.  

या वर्गीकरणावरून त्यावेळी क्रमांकासह लेबल लावून ग्रंथ रचून ठेवलेले आहेत.  राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैऱ्हाजेरीमध्ये कोणासही जाण्याची मुभा न्हवती. राजगृहाच्या दाराशी त्यांचा कुत्रा पीटर हा बाबासाहेबांच्या ग्रंथालयाची राखण करीत असे.  एवढ्या प्रचंड ग्रंथ भांडारामध्ये कोणतेही पुस्तक हवे असल्यास त्यांना अचूक मिळत असे, इंग्लंडच्या ठक्कर कंपनीतून त्यांनी त्यासाठी खास ग्रंथालय कार्डे बनवून घेतली होती व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवून ती यादी पूर्ण करून घेतली होती.   

राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम आपल्या लाडक्या रामुस, रमाईस राजगृहामध्ये आणले होते. राजगृह उभा राहिल्या नंतर  बाबासाहेबांनी डबक चाळीतील सर्वाना आमंत्रित केले होते. तेव्हा राजगृहात प्रवेश करताना रमाई सांगत "साहेबांच्या कष्टातून आम्ही हिंदू कॉलनी परिसरात "राजगृह" नामक एक नवीन आणि लेखणी, टोलेजंग वास्तू उभी केली.हे घर नसून एखाद्या महान पंडिताच भव्य - दिव्य ग्रंथ भांडार वाटत.....!" 

बाबासाहेबांचे गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी म्याट्रिक पास झाल्यानंतर त्यांना भेट दिलेले "बुद्धचारित्र" ह्या ग्रंथाने पुत्कांची सुरुवात करून "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी याच राजगृहातील ग्रंथालयात आणला, "भारतीय संविधान", "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहल्याचा हा "राजगृह" साक्षी आहे. आज हि बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेले "राजगृह" त्यातील ग्रंथासह बाबासाहेबांची आतुरतेने वाट पाहत आहे...कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी घर बांधले होते..."पुस्तकांसाठी घर बांधणारे" बाबासाहेब हे जगातील एकमेव व्यक्ती ठरले....!!!   

-  संदर्भ - 
- बहुजन क्रांतिवीर मासिक - (स्वाती जावळे)
- मी साहेबांची रमा (श्रीनिवास भालेराव)  
 - महामानव- डॉ. भीमराव रावजी आंबेडकर'  (डॉ. ज्ञानराज गायकवाड)          
Share:

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Copyright © Buddha and His Dhamma | Powered by Blogger
Design by SimpleWpThemes | Blogger Theme by NewBloggerThemes.com & Distributed By Protemplateslab