Twitter Facebook Delicious Digg Stumbleupon Favorites More
Showing posts with label पत्र. Show all posts
Showing posts with label पत्र. Show all posts

Thursday, 30 May 2013

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं......!!!



बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१

         भवानीचं चित्र असलेलं पत्र.

आजकाल काही सामाजिक संघटना शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून आपल्याला हवे ते वदवून घेण्याचे काम करीत आहेत,   नेटवर अन सर्वत्र या लोकानी असा प्रचार चालविला आहे की बाबासाहेब हे शिवाजी महाराजांचे भक्त होते वा भवानी देवीचे ते भक्त होते. अन पुरावा म्हणुन त्यांचे अगदी सुरुवाते पत्र पुढे केले जाते ज्यावर जय भवानी असे लिहले आहे. तेंव्हा सर्व बौद्धाना सुद्धा शिवाजी महाराज पुज्यस्थानी आहे. तसेच भवानी माताही आहे. एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे. प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का ? पण तत्पूर्वी हे शिवाजी महाराज व भवानीचा विपर्यास परतवून लावण्यासाठी आधी अस्सल पत्रांचे नमूने पहा. 


अगदी सुरुवातीला बाबासाहेबानी आपल्या लेटरहेडवर भवानीचे चित्र व तलवार अन पेन छापून घेतले होते. त्याचे कारण असे आहे की बाबासाहेबांचे मुळ आडनाव सपकाळ अन देवी भवानी ही सपकाळांची कुलदेवता. म्हणुन बाबासाहेबानी तसे चित्र छापून घेतले. पण नंतर हळू हळू त्यानी या देवताना हद्दपार करुन निरिश्वरवादी बौद्ध धर्माला आदर्श मानुन समतेची मुल्ये स्विकारली. पण या लोकांनी बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या ( व नंतर टाकुन दिलेल्या) या भवानीचं भांडवल करुन बाबासाहेबांच्या चरित्रात शिवाजी महाराज घुसडविण्याचा चंग बांधला आहे. पण सुदैवाने बाबासाहेबांच्या एकून वाटचालीत कसा बदल झाला हे दर्शविणार सगळे अस्सल पत्र व लेटरहेट माझ्याकडे असल्यामुळे मी ते सर्व पत्र ईथे कालक्रमानूसार मांडणार आहे. आपल्या लोकांनी आता जागं व्हावं अन या लोकांच्या विपर्यासाला विरोध करावा. आज जर आपण गाफिल बसलो तर उदया हे लोक बाबासाहेबांच्या चरित्रात दैवतांची घुसखोरी करवून इतिहास विकृत केल्या शिवाय थांबणार नाहीत.


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२
मे १९३१ मधले पत्र जिथे भवानी नाही.

१९३१ मधिल हे पत्र (पत्रं - ०२) व त्या लेटरहेड वरील चित्रातील बदल हे सांगते की बाबासाहेबानी भवानीला जयभीम ठोकला अन आपल्या लेटरहेडवर आता फक्त तलवार व लेखनी एवढचं ठेवलं. 

पहिल्या पत्रात तलावर अन लेखनी सोबत तो-यात दिसणारी भवानी माता ईथे बाबासाहेबानी सन्मानपुर्वक बाजूला सारून आपण त्या विचारधारेपेक्शा वेगळ्या विचारधारेचे आहोत याचा पुरावा दिला. आपल्या हजारो पिढ्यानी ज्या भवानीला कुलदैवत म्हणुन जोपासले त्या देवीचा सुरुवातीला बाबासाहेबानाही अभिमान वाटे हे पहिल्या लेटरहेडवरुन खुलासा होतो. पण आता मात्र ती देवी माझ्या वा माझ्या बांधवांच्या दु:खाचे निवारण करणार नाही व नुसती फसवी अन आभासी आदर्श बाबासाहेबानी ओळखली अन लगोलगो त्याना आपल्या आयुष्यात काहिच स्थान नाही हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे या दोन लेटरहेडमधील बदल होय.
बाबासाहेबांच्या जीवनात एक एक गोष्ट कशी बदलत गेली. त्यानी एकदम धर्मांतर केला नसुन तो विचार हळू हळु कसा आकार घेत गेला याचा अंदाज तुम्हाला या अस्सल पत्रांच्या लेखमालिकेतुन येईलच. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील अन शेवटच्या काळातील परस्पर टोकाचे वाटणारे धार्मिक विचार मधल्या काळातील एकंदरीत जुलमी अन जातियभेदाच्या समर्थन करणा-या हिंदूमुळे आकार घेत गेले. बाबासाहेबानी स्वत: आपल्यातील हिंदुला विसर्जीत करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे वडील अत्यंत धार्मिक हिंदु गृहस्थ होते. लहानपणी त्याना श्लोक व स्त्रोते म्हटल्याशिवाय सायंकाळचे जेवण मिळत नसे. अशा धार्मिक वातावरणात ज्याची जडण घडण झाली त्या बाबासाहेबानी आतल्या हिंदूचे विसर्जन करायला बराच वेळ लागेल हे ताळले होते. अन वरील पत्रांतील नमुन्यातुन ती आतमधल्या हिंदुच्या विसर्जनाची श्रुंखला आपल्याला बघता येईल.

    बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३

१९३१ च्या शेवट पर्यंत बाबासाहेबानी आपल्या लेटरहेड मधे केलेला बदल अत्यंत उल्लेखनीय आहे. आज पर्यंत जे बाबासाहेब जय भवानीच्या लेटरडवरुन सर्व पत्रव्यवहार चलवित त्यानी १९३१ च्या शेवटी तो लेटरहेड बाद केला. या नंतर कधीच त्यानी जयभवानी वा आपल्या कुलदेवीच्या नावाचं लेटरहेड वापरलं नाही. यापुढील सर्व पत्र हे त्यांच्या नावानी छापलेल्या लेटरहेडवरच दिसतील.
बाबासाहेबांच्य पुढील सर्व पत्रव्यहारातील लेटरहेडवर त्यांच्या नावाखाली त्यांचे शिक्षण व पदव्या छापलेल्या दिसतात. खरं तर १९३० च्या आधिच त्यानी या सगळ्या पदव्या मिळविल्या होत्या. पण आता पर्यंत त्यानी त्या पदव्यांच्या ऐवजी भवानीला स्थान दिले होते. परंतू महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या विचारांमधे अमुलाग्रह बदल घडून आला. 
त्यानी प्रत्येक गोष्टीला चिकित्सकपणे पाहणे सुरु केले. किंवा आपण जे करणार त्याचं अनुकरण माझा भोळा समाज करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबासाहेबानी प्रत्येक कृती करताना ती पुढे अनुयायांद्वारे अनुकरण करण्यात येणार आहे तेंव्हा ती अत्यंत विचारपुर्वक केली जावी यावर कटाक्षाने लक्ष दिले. अन्यथा माझा बांधव भरकडला जाऊ शकतो याची त्याना जाण होती. याचाच परिणाम म्हणुन बाबासाहेबानी आपल्या कृतून भवानी देवीला बगल दिली अन दलिताना निरिश्वरवादाच्या दिशेनी पाऊल टाकण्याचा संकेत दिला.

१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे. एम. डी. रामटेके सरांकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन. काहि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी महाराज व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात सर्व जातींच्या लोकांना सामील करून घेतले, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार लोकांना किल्लेदार बनविले, आपले अंगरक्षकामध्ये मुस्लीम सरदार देखील सामील केले, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या सोबत घेवून स्वराज्याची पताका फडकावली, छत्रपती शिवरायांचे कार्य अनमोल आहे, परंतु काही समाजविघातक लोक बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारांमध्ये आपले विचार घुसवून राजकीय स्वार्थ साधत आहेत.  
Share:

रमास पत्र......!


रमा.... ! 

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले. 

       दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली. 

      मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. 

     आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. 

       रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. 

      मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे. 

       आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते. 

      मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा ! 

      मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे. 

      खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. 

      माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. 

     रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस. 

     रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
             सर्वांस कुशल सांग.....! 
कळावे,
तुझा....भीमराव.....! 
लंडन, ३० डिसेंबर १९३०

(यशवंत मनोहर यांच्या 'रमाई' या पुस्तकातून साभार) 

Share:

Popular Posts

Copyright © Buddha and His Dhamma | Powered by Blogger
Design by SimpleWpThemes | Blogger Theme by NewBloggerThemes.com & Distributed By Protemplateslab