Twitter Facebook Delicious Digg Stumbleupon Favorites More

Thursday, 30 May 2013

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार आणि दलित समाजाचे उध्दारक म्ह्णून आपण सारे ओळखतो. पण एक तेजस्वी आणि महान पत्रकार अशी त्यांची ओळख सहसा कोणाला नाही. 1920 पासून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता तसेच प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे सुरु केली, अनेक अडचणींचा सामना करीत ही वृत्तपत्रे हिरीरिने चालविली. समता आणि इतर वृत्तपत्रात सातत्याने लेखन केले, असे असूनही वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्‍यांनी त्यांच्या या कार्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत मून  आणि इतर काही अभ्यासकांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेबाबत स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले तेव्हा महाराष्ट्राला त्यांच्या पत्रकारितेची थोरवी लक्षात आली.

हजारो वर्षे आपले प्राक्तन समजून सवर्णांचा अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी 'मूकनायक' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1920 रोजी सुरु केले. तेव्हा डॉ. आंबेडकर इंग्लंडमधून उच्चशिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडून नुकतेच परतले होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात भूमिका विषद करताना त्यांनी म्ह्टले होते "आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही.पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र तीन वर्षे अखंडपणे चालविले  दलित समाजाला जागे करण्यास व आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन संघर्षासाठी सिध्द करण्यास प्रारंभ केला .पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यास पुन्हा इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत अनुयायांना मूकनायक चालविण्याचे आव्हान पेलले नाही त्यामुळे 8 एप्रिल 1923 ला ते वृत्तपत्र बंद पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927  रोजी 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले. या वर्तमानपत्रासाठी त्यांनी आपले रक्त आटवले, इंग्रजांनी देऊ केलेली मोठ्या पगाराची नोकरी नाकारली.अनेकदा हे वृत्तपत्र बंद पड्ले , पण पुन्हा हिरीरिने सुरु केले. मात्र अगदीच नाईलाज झाल्याने 15 नोव्हेंबर 1928 ला हे वृत्तपत्र बंद करावे लागले.वसंत मून यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे "बहिष्कृत भारत वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे पत्र म्ह्णजे धार्मिक किल्ल्याच्या जातीभेदररुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे". या विधानावरुन त्या काळात बहिष्कृत भारत ची कामगिरी किती महत्वाची होती हे जाणवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' हे पाक्षिक सुरु केले, ते पुढे साप्ताहिक झाले व 1956 पर्यंत सुरु राह्रिले. अस्पृश्य समाजाचे प्रश्न इतर समाजालाही कळावेत यासाटी त्यांनी 'जनता' ची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची  दीक्षा घेतल्यानंतर 'जनता' साप्ताहिकाचे नामांतर 'प्रबुध्द भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यावरही अनुयायांनी ते अनेक वर्षे चालविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रांव्रर त्या काळात अनेक सवर्ण नेत्यांनी व त्यांच्या वृत्तपत्रांनी जहरी टीका केली. पण आंबेडक्ररांनी सतत विचारांनीच त्या टीकेला उत्तर दिले, यात त्यांचे मोठेपण जाणवते.लको अनुयायी असतानाही त्यांनी कधी मारा,झोडाची भाषा केली नाही. सतत 36 वर्ष भारताच्या उन्नतीसाठी आपल्या तेजस्वी लेखणीने माग्रदर्शन करणार्‍या या महान पत्रकाराने जातीपाती तोडण्यापासून देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमके लेखन केले आहे. त्यांची पत्रकारिता म्ह्णजे भारताच्या इतिहासाचा उलगडा करुन भविष्यातील बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी पत्रकारिता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वृत्तपत्रांची शीर्षके निवडतानाही अतिशय समर्पक निवड केली होती.अनेक वर्षे ही वृत्तपत्रे चालविणे सर्वच संदर्भाने अतिशय कठीण होते.ज्या समाजापर्यंत शिक्षण फारसे पोहोचलेच नव्हते व ज्यांचे सातत्याने आर्थिक व सामाजिक शोषण झाले अशा दीनदलित समाजातील लोक मोठया प्रमाणात वृत्तपत्राचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा करणे शक्य्‍ा नव्हते, हे ठाऊक असूनही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाहीत.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा प्रवाही व धारदार होती. 'बहिष्कृत भारत' च्या एका अग्रलेखात भारतीय समाजाच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा करताना त्यांनी लिहिले आहे "जेव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यापेक्षा शेतकी वगैरे कामाकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांना दिसून आले तेव्हा जीत लोकांचा संहार करण्याची पध्दती नाहीशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पध्दत अमलात आली". यात पुढे त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलो हे नसून शत्रूंनी ठार मारले नाही हेच होय.शास्त्राप्रमाणे वाघून जर काही झाले असेल तर ते हेच की,इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही अधिक हतबल झालो व कोणाविरुध्द दोन हात करुन जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्याजवळ राहिली नाही".
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्या अनुयायांना देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही अडचणी आल्या तरी आपली लेखणी कुठे गहाण ठेवली नाही आणि जाहिरातींच्या मलिदयाची अपेक्षा बाळगली नाही. स्वतंत्र प्रज्ञेने त्यांची लेखणी सतत धारदार तलवारीच्या पात्यासारखी झळाळत राहिली. त्यांच्या पत्रकारितेचा विचार एका चौकटीत करण्याचे प्रकार थांबायला हवेत.त्यांची पत्रकारिता बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी परिपूर्ण पत्रकारिता आहे.हृी पत्रकारिता यापुढ्च्या काळातही योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करीत राहणार आहे, याची खात्री आहे.

- दैनिक दिव्य मराठी.......!
Share:

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Copyright © Buddha and His Dhamma | Powered by Blogger
Design by SimpleWpThemes | Blogger Theme by NewBloggerThemes.com & Distributed By Protemplateslab