नागपूरच्या दीक्षाभूमी मैदानावर हजारोंच्या जमावासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' बुद्धं शरणं गच्छामि ' चा उच्चार केला आणि भारतीय समाजरचनेत एक अभूतपूर्व क्रांती झाली.
या वेळी डॉ. बाबासाहेबांसमवेत शुभ्र पांढरी साडी नेसलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकरही होत्या. उच्च जातीत जन्माला आलेल्या माईसुद्धा आपल्या पतीसमवेत बौद्ध धर्मात आल्या आणि या चळवळीला नवे परिमाण प्राप्त झाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी घडलेला हा प्रसंग ही माईंच्या आयुष्यात घडलेली सर्वात महत्त्वपूर्ण घटना. त्यानंतर अडीच महिन्यांतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर माईंना बहुतांश काळ विजनवास व उपेक्षेचे जिणेच सहन करावे लागले. बाबासाहेबांशी विवाह केल्यानंतर त्यांनी ज्या समाजाला आपले मानले , त्या समाजाच्या नेत्यांनी माईंना दूरच ठेवले.
बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईंविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे दलित समाजही त्यांच्यापासून ' अंतर ' ठेवून राहिला. परिणाम हाच की , ' बाबासाहेबांची पत्नी ' म्हणून त्यांना मिळालेला मरणोत्तर ' भारतरत्न ' किताब स्वीकारणाऱ्या माईंच्या आयुष्याची अखेरची वषेर् त्यांना दादरला दहा बाय दहाच्या चाळीतील खोलीत नातेवाईकांच्या आश्ायाने व्यतित करावी लागली. दलित चळवळीतील अनेक नेते बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून चैनीचे जीवन जगत असताना त्यांच्या विधवा पत्नीची आयुष्याच्या संध्याकाळी अशी परवड व्हावी , हे दुदैर्व. परंतु स्वत: माईंना त्याची फारशी फिकीर नव्हती.
गेली सात-आठ वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या व त्यांचे समाजात वावरणे जवळपास बंदच झाले होते. पण त्याआधी माई बऱ्याच वेळा पूर्वस्मृतींतच रमलेल्या असत. बाबासाहेबांच्या उतरत्या वयात त्यांची शुश्रुषा करण्याच्या निमित्ताने डॉ. सविता कबीर त्यांच्या सान्निध्यात आल्या व पुढे विवाहबद्ध झाल्या. त्या वेळी बाबासाहेब राष्ट्रीय राजकारणातील मोठे नेते होते. पं. नेहरू आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांबरोबर त्यांची ऊठबस होती. त्यांच्या समवेत माईसुद्धा सर्वांच्या परिचयाच्या झाल्या होत्या. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर या ओळखीचा लाभ करून स्वत:च्या आयुष्यात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न माईंनी कधी केला नाही.
बाबासाहेबांनंतर रिपब्लिकन पक्षाचे वारंवार तुकडे होत राहिले. त्या राजकारणातही माईंची डाळ शिजली नाही. कधी या कधी त्या गटाने त्यांचा वापरच करून घेतला. अर्थात बाबासाहेबांची त्यांच्या अखेरच्या काळात केलेली शुश्रुषा , विवाह आणि नंतर त्यांच्यासमवेत बौद्ध धर्माची दीक्षा हेच माईंचे हयातभरचे भांडवल होते. त्यांच्या स्मृती त्यांनी स्वत:पाशीच जपून ठेवल्या व त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याचे टाळले ; त्यामुळेच त्यांच्या वाट्याला उपहास व तिरस्कार आला. बाबासाहेबांचा निकट सहवास लाभूनही त्या त्यांच्या राजकीय वारस बनू शकल्या नाहीत , याचे त्यांची पूर्वाश्ामीची जात , हेच एकमेव कारण नव्हे. बाबासाहेबांचे राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञान आणि त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता व जाणिवा यांचे फारसे भान माईंना नव्हते.
याचे कारण बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून त्यांचा संसार सांभाळणारी गृहिणी व शुश्रुषा करणारी नर्स या भूमिका पार पाडण्यातच माईंनी धन्यता मानली. म्हणूनच त्यांचे अस्तित्व सावलीसारखे राहिले. बाबासाहेबांची सावली म्हणून राहिलेल्या माईंचे सार्वजनिक अस्तित्व त्यामुळेच बाबासाहेबांनंतर संपुष्टात आले ; पण त्यांनी राजकारणात हातपाय मारण्याचा प्रयत्न केलाच नाही, असे नव्हे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून अरुण नेहरू यांच्या विरोधात उभ्याही राहिल्या होत्या. त्यामुळे काही काळ त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत राहिला इतकेच. अखेरच्या आजारपणात त्या मुंबईतील सरकारी रुग्णालयात होत्या. केवळ ' उपचार ' म्हणून काही राजकीय मंडळींनी रुग्णालयात हजेरी लावली, या पलीकडे नव्वदी ओलांडलेल्या माईंची फारशी दखल घेण्याची फुरसद कुणाला नव्हती. माईंच्या निधनामुळे बाबासाहेबांसारख्या उत्तुंग युगपुरुषाच्या निकट सान्निध्यात राहिलेला अखेरचा दुवा निखळला....!
अग्रलेख -
महाराष्ट्र टाईम्स
0 comments:
Post a Comment